पुणे : नववर्षाचा एकीकडे उत्साह, जल्लोष दिसून येत असतानाच दुसरीकडे कर्तव्यावर असणाऱ्या पीएसआयचा अपघातात मृत्यूझाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे. पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावरती असतानाच अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जितेंद्र गिरनार असे मृत्यू झालेल्या पीएसआयचे नाव आहे. ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून पीएसआय गिरनार हे चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरुन ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेन मधून चालला होता, मात्र, कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला आणि पीएसआय गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोरदार धडक बसली. या घटनेमध्ये गिरनार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गिरनार यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा भला मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जाती आहे.