Unemployment Rate : पुणे : जसजशा निवडणूका जवळ येतील तसतशा सरकारची डोकेदुखी वाढत चालली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी आलेले हे बेरोजगारीचे आकडे सरकारची चिंता वाढवू शकतात.
जीडीपीत वाढ मात्र तरूण बेरोजगार
सरकारी पदे रिक्त : बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी लिमिटेडने ही माहिती दिली. सप्टेंबर 2023 मध्ये बेरोजगारीचा दर 7.09 टक्के होता. तोच ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर 10.05 टक्क्यांवर पोहोचला. भारताचा जीडीपी 6 टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे, पण तरीही तरुणांसाठी नवीन रोजगार निर्माण होत नाहीत असे समोर आले आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, कृषी उत्पादनात 4.5% वाढ झाली, जी सर्वात कमी वाढ आहे. ‘ग्रामीण भारतातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. आतापर्यंत पाऊस फारसा चांगला न झाल्याने भारतात पेरण्याही कमी झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 10 लाख भरती करण्याची घोषणा केली आहे. परंतु आकडेवारीवरून असे दिसून आले की, गेल्या 8 वर्षांत अर्ज केलेल्या लोकांपैकी केवळ 0.3% लोकांना नोकऱ्या दिल्या गेल्यात. कृषी क्षेत्रात बेरोजगारी वाढत आहे. अनियमित पाऊस आणि उष्णतेच्या लाटेमुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे.
2 वर्षात बेरोजगारी सर्वोच्च पातळीवर : अशा स्थितीत आगामी निवडणुकीत हा मोठा मुद्दा बनू शकतो. खाजगी संशोधन संस्था सीएमआयईने (CMIE)दावा केला आहे की ऑक्टोबर 2023 मध्ये भारतात बेरोजगारी 2 वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. बेरोजगारी प्रमुख्याने देशातील ग्रामीण भागात अधिक वाढली आहे. त्याचा जास्त परिणाम एकूण बेरोजगारीच्या दरावर दिसून येत आहे.