लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत शासनाकडून मंजूर झालेल्या ८९ कोटी ९७ लक्ष रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला आज रविवारी (ता.१६) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शुभारंभ करण्यात आली आहे.
कदमवाकवस्ती येथील पालखी स्थळ येथे पाणी पुरवठा योजनेच्या कार्यरंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कदमवाकवस्तीचे माजी सरपंच गणपत काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण काळभोर होते. यावेळी भाजपा कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, माजी उपसरपंच अशोक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कदमवाकवस्ती येथील ५५ लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या रुपये १० हजार ९४६ इतका दरडोई खर्च असलेल्या नळ पाणी शासन निर्णय पुरवठा योजनेच्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा योजनेचा विकास करण्यासाठी ८९ कोटी ९७ लक्ष आणि १५ हजार (अक्षरी रूपये एकोणनव्वद कोटी सत्यान्नव लक्ष पंधरा हजार फक्त) (ढोबळ) इतक्या किंमतीच्या निधी मिळणार आहे.
यावेळी बोलताना सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या कि, सद्याच्या काळात वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याची समस्याही वाढत आहे. अनेक ग्रामीण भागात पाण्याची सोय नाही. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे. यासाठी भारत सरकारने जल जीवन मिशन योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पिण्याचे शुद्ध आणि मोफत पाणी मिळणार आहे. यामुळे नागरिकांच्या पाण्यासंदर्भातील समस्या सुटणार आहेत. तसेच या अभियानांतर्गत ज्या भागात पाणी नाही, तेथे प्रत्येक घरापर्यंत पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. आणि यामुळे गावाच्या विकासात भर पडणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन दाभाडे, रमेश कोतवाल, नासिरखान पठाण राणी विजय बडदे माधुरी काळभोर, सविता साळुंखे, वैजंता कदम, राजश्री काळभोर, ग्रामसेवक अमोल घोळवे, पोलीस पाटील प्रियंका श्रीकांत भिसे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम, सुभाष कदम, बाळासाहेब गुजर, अशोक शिंदे, मधुकर कदम, मुकुंद काळभोर, कुमार कदम, अमर काळभोर, दिलीप काळभोर, माऊली काळभोर, सुरेश काळभोर, जयसिंग घाडगे, अभिजीत बडदे, विकी नामुगडे, शब्बीर पठाण, विजय बोडके, रामदास पवार, अविनाश बडदे, दीपक काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.