पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने ६, ७ आणि ८ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या यूजीसी नेट डिसेंबर २०२४ परीक्षेसाठी हॉल तिकीट प्रसिद्ध केले आहे. ज्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते उमेदवार आता https:/// ugcnet. nta. ac. in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे लॉगिन क्रेडेंशियल्स वापरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
ही परीक्षा देशभरातील विविध शहरांमध्ये संगणक आधारित चाचणी पद्धतीने ८५ विषयांसाठी घेतली जाईल. हॉल तिकिटामध्ये उमेदवारांना परीक्षा केंद्र, वेळ आणि उमेदवाराची माहिती याविषयी तपशील पाहायला मिळेल. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी हॉल तिकिटावरील फोटो, स्वाक्षरी, बारकोड आणि क्यूआरकोड तपासणे गरजेचे आहे. फोटो, स्वाक्षरी, बारकोड आणि क्यूआरकोड यांपैकी काहीही गहाळ असल्यास, उमेदवारांनी ते पुन्हा डाउनलोड करावे.
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे. होम पेजवर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक निवडावी. लॉग इन करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकल्यानंतर उमेदवारांना हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल. परीक्षेसाठी हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट घेता येणार आहे. हॉल तिकिटासंदर्भात काही अडचणी असल्यास उमेदवारांना एनटीएशी संपर्क साधता येणार आहे.