मुंबई, महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. असे असताना शिवसेनेवर (उबाठा) टीका करणाऱ्या सर्वच विरोधकांचा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जोरदार समाचार घेतला. ‘शिवसेनेसमोर सध्या संकट नाही तर संधी आहे. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. शिवसेनेच्या जीवावर जे मोठे झाले, त्यांनी शिवसेनेला आलेली फुलं तोडून नेली. पण माझी मूळं घट्ट आहेत’, असे त्यांनी म्हटले.
मुंबईत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘भाजपवाले सगळं उचलून गुजरातला नेणार आहेत. राख इकडे, रांगोळी तिकडे असा सगळा प्रकार सुरू आहे. त्यामुळेच सगळे उद्योग तिकडे नेले जात आहेत. कोकणला बर्बाद करणारी रिफायनरी इकडे आणत आहेत.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर यांनी शिवसेना संपवायचा घाट घातला. महाराष्ट्रात जर कुणी यांना रोखणार असेल तर ती फक्त शिवसेना आहे, दुसऱ्या कुणाच्यात हिंमत नाही. त्यामुळेच ते आम्हाला संपवायला निघालेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला.
महाराष्ट्राची इतकी लाजिरवाणी स्थिती कधीच नव्हती..
मोदी सरकार येण्यापूर्वी देशात काहीही चांगले घडले नसल्याचे भासवले जात आहे. यास गद्दारही तितकीच साथ देत असून, ते सर्व दिल्लीश्वरांच्या पायी नतमस्तक झाले आहेत. महाराष्ट्राची इतकी लाजिरवाणी स्थिती कधीच नव्हती. या सर्व गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.
भाजपला चर्चेतून मार्ग सोडवू म्हणालो, पण…
भाजप-शिवसेना युती कशी तुटली यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणा्ले, ‘2019 मध्ये एकनाथ खडसे यांचा अचानक फोन आला. आपलं जमेल असं वाटत नाही, असे ते मला म्हणाले. पण थोड्याफार जागांचा प्रश्न असल्याने मी त्यांना चर्चेतून प्रश्न सोडवू असं म्हणालो. पण तरीही युती तोडली, असेही ठाकरे यांनी सांगितले.