नाशिक : राज्य शासनाच्या ‘एक रुपयात पीक विमा’ योजनेतून अनेक ठिकाणी बोगस पीक विमा उतरवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातही चांदवड येथील दोन शेतकऱ्यांनी चक्क एन.ए. प्लॉटवर कांदा लागवड दाखवून पीक विमा उतरविल्याचे उघड झाले आहे. याबाबत कृषी विभागाला अहवाल पाठविण्यात आला असून, त्यांच्या निर्देशानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचा पीक विमा उतरवला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांचे योगदान भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा घेता आला. अनेक शेतकऱ्यांना योजनेचा फायदा झाला. मात्र, काही शेतकऱ्यांनी बोगस वीक विमा उतरवल्याचे देखील समोर आले. नाशिक जिल्ह्यातील पाच हजार १७२ शेतकऱ्यांचा पीक विमा बोगस असल्याची माहिती समोर आली होती. पीक विमा योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कांदा पीक होत नसलेल्या ठिकाणी देखील कांदा लागवड दाखवत खोटा विमा उतरवल्याचे समोर आले.
यंदाच्या खरिपात तीन कोटी ९६ लाखांचा बोगस पीक विमा उतरविल्याची माहिती कृषी विभागाने दिली. जिल्ह्यातील येवला, निफाड, देवळा, बागलाण, कळवण, मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यांमधील ३६७० कांदा उत्पादक, तर ५०५ डाळिंब, द्राक्ष, सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचा यात समावेश आहे.
याप्रकरणी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी म्हटले आहे की, कृषी विभागाच्या माध्यमातून निर्देश प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भात तपासणी केली. पीक विम्यात काही त्रुटी आढळल्या आहेत. कृषी विभागाला तसा अहवाल देखील पाठविला आहे. त्यावर मिळणाऱ्या निर्देशानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. कांदा लागवड आणि फळबागांची पीक विमा रक्कम जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी यापुढे दक्षता घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.