उरुळी कांचन : सहजपूर फाटा (Sahajpur Phata) येथे एकाला पिस्तुलासह तर पिस्तुल विकणाऱ्याला पिस्तुलसह देलवडी (ता. दौंड) येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (ता.२९) अटक केली आहे.
अथर्व संदीप जाधव (वय-१८, रा. गोंधळे नगर हडपसर ता. हवेली जि. पुणे) व विजय बाळकृष्ण नेटके (रा. देलवडी ता दौंड जि पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस असा ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड तालुक्यात गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना सहजपूर फाटा येथे एक इसम गावठी पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी अथर्व जाधव याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल मिळून आले.
दरम्यान, आरोपी अथर्व जाधव याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने सदरचे पिस्तुल हे त्याचा मित्र विजय नेटके याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी विजय नेटके याला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडेही एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस असा एकूण ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करुन पुढील तपासासाठी यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, हवालदार विजय कांचन, अतुल डेरे, अमोल शेडगे व धिरज जाधव यांच्या पथकाने केली आहे.