पुणे: जादूटोणा केल्याच्या संशयावरून पद्मावती परिसरातील एकाचा सुपारी देऊन खुनाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, याप्रकरणी सुपारी देणाऱ्यासह दोन हल्लेखोरांना पोलिसांनी गुरुवारी (दि. २०) अटक केली.
सागर सतीश कुंभार (वय ४१), तौरस बाळू कारले (वय ४३, दोघे रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि सागर शशिकांत सोनार (वय ३२, रा. मोरे वस्ती, पद्मावती) ही आरोपींची नावे आहेत. पद्मावती परिसरात सोनू पांडू होडे (वय ६७, रा. मोरे वस्ती, पद्मावती) यांच्यावर गेल्या शनिवारी (दि. १५) तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
होडे यांच्यावर हल्ला करणारा आरोपी सागर कुंभार सुपर इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी सोनार याच्या सांगण्यावरून होडे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची कबुली कुंभारने दिली.