मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचे होणारे हल्ले काही थांबण्याचे नाव घेईना. लौकी परिसरातील राणूबाई मंदिर परिसरात दोन बिबट्यांनी मोटार सायकलस्वार नागरिकांवर हल्ला चढवला. या घटनेत दोन जण जखमी झाले असून दोन नागरिक थोडक्यात बचावले आहेत. ही घटना रविवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत या रानुबाई मंदिर परिसरात दुचाकी वाहनांवर हल्ले करण्याच्या अनेक घटना घडल्या असून वनविभाग या घटना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
नेमकं काय घडलं?
संजय नामदेव थोरात हे मोटार सायकलवरून पत्नी आणि मुलाला घेऊन मंचर येथे जात होते. राणूबाई मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावर बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला. त्यावेळी संजय थोरात यांनी आरडाओरड केला. हातातील डबा असलेली पिशवी बिबट्याला फेकून मारली. त्यावेळी बिबट्या काही काळ बाजूला गेला. द्राक्ष बागायतदार निलेश कानडे आणि मित्रांनी त्यांना चार चाकीच्या वाहनाचा उजेड दाखवून पुढे मंचर येथे जाण्यासाठी मदत केली.
अक्षय मारुती थोरात, त्याची आई मनीषा मारुती थोरात आणि चुलत भाऊ प्रवीण बळीराम थोरात हे तिघे जण मोटार सायकल वरून दरेकरवस्ती येथून चांडोली बुद्रक गावातील न्हायरेमळ्याकडे जात होते. त्यावेळी प्रवीण गाडी चालवत होते. त्यावेळी राणूबाई मंदिरानजीक रस्त्याच्या दुतर्फा दबा धरून बसलेल्या बिबट्यांनी हल्ला केला. त्यानंतर एक बिबट्याने हल्ला केला तर दुसऱ्या बिबट्याने मोटार सायकलचा पाठलाग केला.
अक्षयच्या उजव्या पायाला बिबट्याचे पंजे लागल्याने जखम झाली आहे. तर प्रवीणच्या उजव्या पायाला बिबट्याची धडक बसल्याने मुका मार लागला आहे. जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. बिबट्याकडून हल्ला केल्यानंतर दिली जाणारी लस मंचर उपजिल्हा रुग्णालयत उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना पुणे येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जावे लागले.