इंदापूर : शहरात घरफोड्या करणाऱ्या दोन चोरट्यांना इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून १६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. शामराव पवार (रा. लासुर्णे ता. इंदापूर) व युवराज अर्जुन ढोणे (रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रवासात महिलेला लुटणे, गांजा विक्री व काडतूस बाळगणे अशा वेगवेगळ्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात या पथकाला यश आल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना हद्दीत होणाऱ्या घरफोड्यांना पायबंद करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने इंदापूर पोलिस ठाणे हद्दीत दिवसा व रात्री गस्त करून गुन्हेगारांवर वॉच ठेवला जात होता.
शहरातील बाब्रस मळा येथील फिर्यादी प्रविण हरिदास पाटील आणि जय भारत सोनवणे (रा. शंकर हौसिंग सोसायटी, इंदापूर) यांच्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते व पोलिस हवालदार गणेश डेरे यांनी तांत्रिक विश्लेषन व सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली.
तसेच गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी पवार व ढोणे या दोघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून एकूण १६ लाख रुपये किमतीचे २४ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. या सराईत गुन्हेगारांवर पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यात १५ गुन्हे दाखल आहेत. ही कामगीरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मागदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक स्मिता पाटील यांच्या पथकाने केली.