जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात काल 31 डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळची घटना घडल्याचे समोर आले आहे. मंत्री गुलाबराव पाटलांच्या परिवाराला घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या आणि कारचा कट लागल्याच्या कारणातून हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. यानंतर पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यानंतर संतप्त जमावाने पाळधी गावात दगडफेक करत जाळपोळ केली. या घटनेत 12 ते 15 दुकाने जळली आहेत. या घटनेने गावात तणावपुर्ण शांतता निर्माण झाली आहे.
रात्री उशिरापर्यंत दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलिस घेत आहेत. घटनास्थळावरून आरोपी पळून गेल्याने परिस्थिती नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
पाळधी गावांमध्ये संचारबंदी..
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पाळधी गावांमध्ये दोन गटांमध्ये वाद पेटला आणि जाळपोळ आणि दगडफेक झाली आहे . पाळधी गावांमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तसेच पोलिसांनी गावांमध्ये शांतता पाळा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही केलं आहे. एकंदरीत 20 ते 25 जणांवरती झालेल्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून काही संशियितांना रात्री ताब्यात घेण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
काल रात्री मंत्री गुलाबराव पाटील यांचं कुटुंब वाहनांमधून जात असताना, वाहन चालकाने हॉर्न वाजवला आणि त्याचा राग काही जणांना आला आणि त्यानंतर दोन गट आपापसात राडा झाला. त्यानंतर संपूर्ण घटना घडली आहे. वाहनांची आणि कारची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस गावामध्ये दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. गावात तणावपूर्ण शांतता दिसून येते आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.