अजित जगताप
सातारा : तेहतीस कोटी देवांचे वास्तव्य असणाऱ्या गाईला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. त्याच गाईंचा दरे तांब ता महाबळेश्वर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावात महावितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणाने विजेचा झटका लागून मृत्यू झाला आहे. याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हिंदुत्ववादी विचारांची पाठराखण करणारे शिंदे सेना व भाजपचे सरकार आले आहे. परंतु, प्रश्न सोडविण्याची गती मंदावली आहे. शासकीय अधिकारी वर्ग सामान्य माणसाच्या सूचना ऐकत नाहीत, विशेष म्हणजे भाजपच्या सेवा पंधरावड्यात ही अवस्था पाहण्यास मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे तांब ता महाबळेश्वर गावातील जेष्ठ नागरिक व शेतकरी विठ्ठल गोविंद आखाडे हे आपल्या दहा ते बारा गाई चारण्यासाठी शिवारात घेऊन गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास दुपती व दुसरी गाभण गाईचा पाय विद्युत पुरवठा करणाऱ्या जमिनीवरील वायरीवर पडल्याने विजेचा झटका बसून जागेवरच मृत्यू झाला.
गेल्या आठवड्यात विद्युत खांबावरील वायर निखळून पडली होती. वायरमनने येऊन सदरची वायर शेजारील झाडाला अडकवून ठेवली होती.परंतु, ती खांबावर व्यवस्थित न लावल्याने अखेर सूचना करूनही काम न केल्याने दुर्घटना घडली. असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
दरे तांब या गावाची ग्रामपंचायत निवडणूक होऊ घातली आहे. त्या बैठकीतही या उघड्यावरील वायर बाबत काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. पण, कारवाई होत नसल्याने अखेर मुक्या गाईला संकटाशी सामना करावा लागला आहे.सदरचे शेतकरी विठ्ठल आखाडे व सौ भिमाबाई आखाडे हे दरे तांब येथे राहतात. त्यांच्याकडे अनेक गाई आहेत. गाई चारण्यासाठी ते शिवारात घेऊन जातात. तर काही वेळेला मजुरी मिळेल म्हणून तापोळा येथे हमाली करतात.
काल सकाळी ते गाई घेऊन दरेतांब ता महाबळेश्वर येथील शिवारात गेले होते.गाईंचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याने त्यांचा मोठा आधार गळून पडला आहे. सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.गाईच्या दुधावर त्यांची उपजीविका सुरू होती. घटना घडल्यानंतर त्यांनी प्रसंग पाहून इतर गाईना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले अन्यथा आणखी गाईचा मृत्यू झाला असता अशी चर्चा होत आहे.शासकीय पातळीवर पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याच दरे तांब गावात असा प्रकार घडल्याने ‘भाताची परीक्षा शिताने होते’.अशी मार्मिक टीका विरोधक करू लागले आहेत.हिंदू संस्कृती जतन करण्यासाठी व स्थानिक लोक, मुक्या जनावरांची विजेच्या झटक्या पासून संरक्षण करावे. या साठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक भूमीपत्रांनी केली आहे.