अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी येथे पतंग पकडण्यासाठी पळणाऱ्या दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुदैवी घटना शुक्रवारी (दि. २७) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे पोखर्डी गावावर शोकळा पसरली आहे. अनिकेत रतन आल्हाट (वय ११) व दिनेश विशाल देठे (वय १०) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संक्रातीचा सण जवळ आल्याने लहान मुले सर्वत्र पतंग उडवित आहेत. शुक्रवारी सायंकाळी पोखर्डी येथील चंद्रकांत सुंदर देठे यांच्या शेताजवळ शाळा सुटल्यानंतर काही मुले पतंग उडवित होती. तिथे जवळच विहीर होती. पतंग उडवित असताना एक पतंग तुटला. त्यामुळे पतंग पकडण्यासाठी अनिकेत व दिनेश पळत सुटले. पतंगाकडे पाहत असताना त्यांना विहिरीचा अंदाज आला नसावा. ते थेट दोघे विहिरीत पडले.
हा प्रकार सोबतच्या मुलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील नागरिक गोळा झाले. याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी दोन्ही मुलांना विहिरीतून तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांना मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने पोखर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.