मुंबई : टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर विकत घेणार नसल्याचं जाहीर केलंय. कंपनीनं अटी मोडल्या असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळं आता ट्विटरची ४४ अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आलाय. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटरला ५४.२० बिलियन डॉलर्समध्ये खरेदीची ऑफर दिली होती. अखेर ४४ बिलियन डॉलर्समध्ये खरेदी करण्याचं ठरलं होतं. मात्र आता इलॉन मस्क यांनी ट्विटरवर असलेल्या फेक खात्यांच्या मुद्द्यांवरून हा करार रद्द केला आहे. यामुळे ट्विटरकडून इलॉन मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
एलॉन मस्क यांनी शुक्रवारी यासंदर्भात घोषणा करत, आपण ट्विटर विकत घेणार नसल्याचं सांगितलं. मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार संपल्याची घोषणा करत कंपनीवर आरोप केलेत. मस्क यांनी म्हटलंय की, ‘ट्विटर कंपनी बनावट खात्यांचा तपशील देण्यात अयशस्वी ठरलीय.’ दरम्यान, एलॉन मस्कच्या या निर्णयाविरोधात ट्विटर कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे.
ट्विटर आणि इलॉन मस्क यांच्यातील हस्तांतरणाची प्रक्रिया जवळपास दोन महिन्यांपासून सुरू होती. मात्र अचानक यामध्ये इलॉन मस्क यांनी हा करार रद्द करत असल्याचं सांगितलं. मस्क यांनी म्हटलं की, “ट्विटरने करारातील अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे हा करार रद्द करत आहे.”
दरम्यान, इलॉन मस्क यांनी खरेदीचा करार रद्द केल्यानंतर कंपनी आता न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे. ट्विटरने हे मर्जर पूर्ण व्हावे असं म्हटलं आहे, तसंच हे होण्यासाठी न्यायालयात जाण्याचीही तयारी केली आहे. ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी म्हटलं की, “ट्विटरचे संचालक मंडळ इलॉन मस्क यांच्यासोबत झालेल्या करारावर हे हस्तांतरण पूर्ण कऱण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही या मर्जरला पूर्ण करण्यासाठी कायदेशीर कारवाई करू. आम्हाला विश्वास आहे की डिलवेअर कोर्ट ऑफ चॅन्सरीमध्ये आमचा विजय होईल.”