लोणी काळभोर : जगद्गुरु संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा लोणी काळभोर येथील मुक्काम बदलून कदमवाकवस्ती येथील नवीन पालखी तळावर करण्यात आला आहे. तर उरुळी कांचन येथील दुपारचा विसावा ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिराच्या ऐवजी पालखी मार्गावरच म्हणजे पुणे-सोलापूर महामार्गावरच विसावा होणार आहे. ५० ते ६० वर्षाची परंपरा मोडीत काढून पालखी सोहळा प्रमुखांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पूर्व हवेलीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे पालखी सोहळा प्रमुख व लोणी काळभोर, उरुळी कांचन ग्रामस्थांमध्ये वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वारकरी सांप्रदायाच्या वैष्णवांचा मेळा हा गेल्या 338 वर्षांपासून देहू ते पंढरपूर असा चालवला जातो, तो मार्गस्थ होत असताना वेगवेगळ्या गावातून, वाड्या वस्त्यांतून रस्त्याने जात असतो, या मार्गातील वैष्णवाला तुकाराम महाराजांबरोबर विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेता येतो. यावर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 28 जूनला सुरु होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी लोणी काळभोर येथील मुक्काम व उरुळी कांचन येथील विसाव्याच्या संदर्भात बदल केले आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. या सर्व पालख्यांना शेकडो वर्षांची परंपरा आहे. परंपरेनुसार वारकरी पंढरपूरला जातात. पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा, वारकऱ्यांना अन्न, पाणी, निवारा उपलब्ध व्हावा म्हणून ग्रामस्थ एकदिलाने झटत असतात. सर्वोतोपरी प्रयत्न करून वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी जीवाचे रान करत असतात.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरळीत आहे. त्या ठिकाणी कोणताही वाद नाही, विसंवाद नाही. काही मर्यादा नाहीत मग लोणी काळभोर व उरुळी कांचन या ठिकाणी दाखल होणाऱ्या संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीला का अडचण येते? याचे नेमके कारण अजूनही समजू शकले नाही. मात्र, लोणी काळभोर व उरुळी कांचन गावातील नागरिकांमध्ये पालखी सोहळ्याच्या विसावा व मुक्कामाबाबतीत घेतलेल्या या निर्णयाबद्दल प्रचंड नाराजी वाढली आहे.
दरम्यान, ही परंपरा पालखी सोहळा जसा हडपसरवरून एक पालखी सासवडमार्गे आणि एक पालखी लोणी काळभोरमार्गे मार्गस्थ होऊ लागल्या, तेव्हापासून हा प्रघात…पायंडा…रुढी आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून देहू संस्थांनचे पालखी सोहळा प्रमुख व त्यांचे सहकारी कारण नसताना उरुळी कांचनवासियांना वेठीस धरत आहेत. प्रत्येक वेळी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर झाला की, उरुळी कांचनला विसाव्याला मंदिरात न जाता सोलापूर रोडवरच थांबणार, उरुळी कांचन ग्रामस्थांनी तेथेच आमची सोय करावी, अशा पद्धतीची भाषा वापरून उरुळी कांचन व पंचक्रोशीतील जनतेला त्रास देण्याचे काम करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.
मागील अनेक वर्षांपासून पालखी येते गावात
याबाबत लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर म्हणाले, “मागील अनेक वर्षांपासून पालखी गावात येत आहे. पालखी सोहळा प्रमुखांनी परत एकदा निर्णय घेऊन परंपरेनुसार यावर्षीही पालखी गावात आणावी. सोहळा सुरु झाल्यापासून पालखी गावात येत आहे. त्यामुळे पालखी ही लोणी काळभोर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातच मुक्कामी राहावी.
…तर पालखी सोहळा पुढे जाऊ देणार नाही
उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, “पालखी सोहळा गावात आला नाही तर पुणे-सोलापूर महामार्गावरून पालखी सोहळा पुढेच जाऊ दिला जाणार नाही. मागील वर्षी प्रांताधिकारी, तहसीलदार व पालखी सोहळ्याचे प्रमुख यांनी लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे पालखी गावात विसाव्यासाठी शाळेच्या मैदानात आणावीच लागेल. अन्यथा पालखी उरुळी कांचन येथून पुढे जाऊ दिली जाणार नाही.
लोणी काळभोर येथील मुक्कामही नवीन पालखी तळावर करणार
”लोणी काळभोर ते यवत हे सुमारे २० ते २५ किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे लोणी काळभोर येथे सर्व दिंड्या बारस सोडून निघत असतात. उरुळी कांचन येथे दुपारच्या विश्रांतीच्या वेळी गावात पालखी जाऊन येण्यासाठी दीड तास लागतो. त्यामुळे येथून पालखी निघण्यास उशीर होत असल्याने यवत येथील मुक्कामी पोहचण्यासाठी उशीर लागतो. यामुळे उरुळी कांचन येथील ग्रामस्थांना विनंती करून दुपारचा विसावा पालखी मार्गावर म्हणजे महामार्गावर ठेवावा, अशी विनंती करणार आहे. त्याचप्रमाणे लोणी काळभोर येथील मुक्कामही नवीन पालखी तळावर करणार आहे”, असे संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी सांगितले.