छत्रपती संभाजीनगर : डिजिटल इंडियामुळे भारतातील व्यवहारही डिजिटल झाले आहेत. फोन पे, गुगल पे अॅपसह इतरही ऑनलाईन पेमेंट सुविधांद्वारे कॅशलेस व्यवहार केले जातात. परंतु छत्रपती संभाजीनगरातील एका पोलिसाने कमालच केली आहे. ऑनलाईन लाच घेताना त्या वाहतूक पोलीसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
संभाजीनगरात वाहतूक पोलिसाने घेतली ऑनलाईन लाच… pic.twitter.com/39E7dkDGVI
— jitendra (@jitendrazavar) July 18, 2024
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका वाहतूक पोलिसाने सिट बेल्ट न लावल्यामुळे कारचालकाला पकडले. त्या कारचालकाला अडीच हजार रुपये दंड भरावे लागणार असे सांगितले. त्यावेळी कारचालक शंभर रुपये देतो असे म्हणाला, तेव्हा शंभर रुपये नका देऊ, असे सांगताना वाहूतक पोलीस व्हिडिओमध्ये दिसत आहे. तुम्हाला अडीच हजार रुपये दंड सांगितला होता. तुमचे अडीच हजार वाचवत आहे, आता पाचशे रुपये भरा.
यावेळी तो वाहनचालक पाचशे रुपये नसल्याचे सांगतो. शेवटी कारचालकाने पाचशे रुपये फोन पे वरून त्या पोलिसाच्या खात्यात जमा केले. ते पैसे मिळाल्यावर वाहतूक पोलीस त्यांना यापुढे सिट बेल्ट लावत जा. नवीन गाडी घेतली असल्याचे सांगताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ 1 मिनिट 46 सेंकदाचा व्हायरल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या सेवन हिल परिसरातील ही घटना आहे. अंबिका पान सेंटर या फोन पे अकाउंटवर वाहतूक पोलिसाने ही पाचशे रुपयांची लाच घेतली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरुन हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सकडून अनेक कॉमेंट केले जात आहे.