लोणी काळभोर: वाहन चालकांनो सावधान! पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते सोलापूर या दरम्यान जर आपण गाडी चालविणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या रस्त्यावरून पुढील काही दिवस आपण प्रवास करणार असाल, तर आपल्याजवळ गाडीच्या सर्व कागदपत्रांसह खिशात किमान आठ ते दहा हजार रुपये असणे आवश्यक आहे. कारण पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते सोलापुर या दरम्यान किमान दहा ते बारा वाहतूक पोलिसांनी ”अभी नही तो कभी नही”! ही भूमिका डोळ्यासमोर ठेऊन ठिकठिकाणी आपली दुकाने थाटून पठाणी वसुली सुरु केली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील बंद पडलेला कवडीपाट टोलनाका, कासुर्डी टोलनाका व सध्या सुरु असलेले पाटस टोलनाका, सरडेवाडी, सावळेश्वर व वरवंड या टोलनाक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नॉनस्टॉप वसुली सुरु केली आहे. गरीब आणि सर्वसामान्य वाहनधारकांना वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी वाहनांचा फोटो काढून मोठा दंड आकारत आहेत. तसेच अनेक वाहनधारकांशी हुज्जत घालून त्यांना अपमानीत करत आहेत. विशेष म्हणजे यात अनेक वाहनधारकांची कोणतीही चूक नसताना विनाकारण आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तसेच वाहतूक पोलिस आपल्या खात्याच्या नावाखाली स्वतःचीच तुंबडी भरत असल्याचे वास्तव अनेक ठिकाणी येत आहे.
वाहनचालकांसाठी डोकेदुखी
वाहतूक विभागातील पोलिसांचे काम वाहतूक नियमन की वसुली? हा प्रश्न या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना सतावू लागला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील बंद पडलेला कवडीपाट टोलनाका, कासुर्डी टोलनाका व सध्या सुरु असलेले पाटस टोलनाका, सरडेवाडी, सावळेश्वर व वरवंड या टोलनाक्यांबरोबरच अन्य ठिकाणीही पोलिसांनी पठाणी वसुली सुरु केली आहे. ही पठाणी वसुली स्थानिक वाहनधारकांना जाचक ठरत नसली, तरी सोलापूर, धाराशिव, लातूर, दौंड, यवत, इंदापूर परिसरातून येणाऱ्या दुचाकी, चारचाकींसह अवजड वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र, याबाबत या भागातील खासदार, आमदार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी मूग गिळून गप्प बसल्याने पोलिसांच्या पठाणी वसुलीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
वाहतूक नियमनाकडे सपशेल दुर्लक्ष
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दैनंदिन छोटे मोठे अपघात होत असतात. रस्त्याची दुरवस्था व वाहतूक कोंडी याचा अगोदरच नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच वाहतूक पोलिसांनी वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या नावाखाली वाहतूक नियमनाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
अभी नही तो कभी नही
या महामार्गावर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अभी नही तो कभी नही या भूमिकेचा अवलंब करत पठाणी वसुली करण्याचा नवीन फंडा सुरु केली आहे. टोलनाक्यांच्या आजूबाजूला घोळक्याने उभे असलेले पोलिस रस्त्याच्या मध्यभागी येऊन वाहने अडवत वसुली करत आहेत. चारचाकी वाहनांमध्ये महिला असतील तर वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पोलिसांच्या या त्रासाला कंटाळून वाहनचालकांना या रस्त्यावरून गाडी चालवावी की नाही, असा प्रश्न पडला आहे. तसेच पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.
पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला
सदरची कारवाई आणि वाहन तपासणी मोहिमेत विना परवाना वाहन चालविणे, कागदपत्रे जवळ नसणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणे, पीयूसी प्रमाणपत्र नसणे आदी नेहमीच्याच सुमार आणि ढोबळ कारणांसाठी पाचशे पासुन हजार रुपयांपर्यंतची पावती फाडत आहेत. वाहतूक पोलिसांच्या पठाणी वसुलीमुळे शेतकरी, कामगार तसेच शहरात रोजगार मिळवण्यासाठी जाणाऱ्या लोकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे.
सर्वसामान्यनागरिकांना त्रास होणार नाही, पोलिसांनी काळजी घ्यावी
पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. अशा बेशिस्त वाहनांवर कारवाई तर दूरच, पोलिस साधे हटकतही नसल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिसांनी नियमबाह्य वाहने चालविणाऱ्या चालकांवर कडक दंडात्मक कारवाई करावी, यामध्ये दुमत नाही. मात्र, याचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.