पुणे : पुणे जिल्ह्यातील पर्यटन वाढवण्यासाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटनदृष्ट्या सर्वाधिक गर्दीची ठिकाणे, डोंगराळ प्रदेश आणि दुर्गम भागांना जोडण्यासाठी जिल्ह्यात आठ ठिकाणी ‘हवाई रज्जू मार्ग प्रकल्प’ (रोप वे) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये सिंहगड किल्ल्यासह शिवनेरी, राजगड या किल्ल्यांसह जेजुरी, निमगाव खंडोबा, लेण्याद्री, भीमाशंकर या ठिकाणी ‘रोप वे’ करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे.
राज्यात ४५ ठिकाणी ‘रोप वे ‘करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ ठिकाणांचा समावेश आहे. त्यात कोणत्या ठिकाणचा ‘रोप वे’ कोणी करायचा याबाबत फक्त निर्णय झाला आहे. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. दरम्यान या आठपैकी तीन ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उर्वरित पाच ठिकाणी ‘राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि.(एनएचएलएमएल) यांच्यावर ‘रोप वे’ची जबाबदारी दिली आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच पर्यटकांसह भाविकांना अवघ्या काही मिनिटांत मंदिरासह गड-किल्ल्यांवर पोहोचणे शक्य होणार आहे.
केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेमार्फत महाराष्ट्रातील 45 ‘रोप वे’ चे काम होणार आहे..या ‘रोप वे ‘मुळे देशातील आणि राज्यातील पर्यटकांना आणखीनच चालना मिळणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.