‘टोरेस’ने गुंतवणूकदारांना लावला चुना; घसघशीत रिटर्न मिळवण्याच्या नादात कष्टाची कमाई गमावली, मुंबईकर सैरभर
मुंबई : पैसे दुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवत टोरेस लिमिटेड या कंपनीने लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकारानंतर घाबरलेल्या गुंतवणूकदारांनी थेट कंपनीचे कार्यालय गाठले. टोरेस लिमिटेड कंपनीच्या या आमिषाला मुंबईतील जवळपास एक, दोन नाही, तर तब्बल तीन लाख लोक बळी पडल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित कंपनीकडे गुंतवणूकदारांचे ५०० कोटी रुपये असल्याची माहितीही दिली जात आहे. त्यामुळे कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली. गुंतवणूकदारांना मोठे आमिष दाखवत गुंतवणूक करा आणि व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आवाहन या टोरेस लिमिटेड कंपनीने केले होते. माफको मार्केटच्या समोर त्यांनी कार्यालय थाटले होते.
त्यांनी गुंतवणूकदारांना पाच वर्षांत दुप्पट, सात वर्षांत तीनपट आणि १० वर्षांमध्ये चौपट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. तसेच दर महिन्याला विशिष्ट व्याजही गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होईल, असेही सांगण्यात आले होते. या आकर्षक योजनेची भूरळ पडलेल्या मुंबई व उपनगरांतील लाखो गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली आहे.
दरम्यान, मीरा-भाईंदर पोलिसांनी याबाबत गुंतवणूकदारांकडून तक्रारी स्वीकारण्यास सुरुवात केली. प्राथमिक चौकशीत कंपनीने मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, कंपनीच्या मालक आणि संचालकांची माहिती गोळा करण्यात येत आहे. या फसवणुकीमुळे अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत.
लोकांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी, निवृत्तीचे पैसे आणि उधारीचे पैसे या कंपनीत गुंतवले होते. या कंपनीचे मुख्य ऑफिस दादरला असून ते अचानक बंद झाले. तसेच मीरा-भाईंदरमधील शोरूमदेखील बंद करण्यात आले. ही दोन्ही कार्यालये बंद झाल्याची माहिती गुंतवणूकदारांना मिळाली. त्यांनी तातडीने या कार्यालयांकडे धाव घेतली. टोरेस कंपनीचा मालक गुंतवणूकदारांचे ५०० कोटी रुपये घेऊन परदेशात पळून गेल्याचा आरोप संतप्त गुंतवणूकदार करीत होते. अद्याप पोलिसांनी याबाबत काहीही माहिती दिलेली नाही.