विशाल कदम
लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मीटर (सुमारे पन्नास फुट) अंतराच्या आतील सर्व प्रकारची अतिक्रमणे येत्या सोमवार (ता. १४) पासुन काढण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी “पुणे प्राईम न्यूज”ला दिली.
कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान अतिक्रमणात वाढ झाली असल्याने सदर रस्ता अरुंद झाला आहे. वारंवार होणारी वहातुक कोंडी व अपघातांचे प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. असेही संजय कदम यांनी सांगितले आहे.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने याबाबतची नोटीस पंधऱा दिवसापुर्वी वर्तमानपत्रात दिली होती. यात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी टोलनाका ते कासुर्डी या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मिटर (पन्नास फुट) अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करणार असल्याचे नमुद केले होते. तसेच अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे स्वतःहुन न हटविल्यास, अतिक्रमण कारवाईचा खर्च अतिक्रमणधारकांकडुन वसुल करण्यात येणार असल्याचे नोटीशीत स्पष्ट करण्यात आले होते. मात्र कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान एकाही अतिक्रमणधारकाने स्वतःहुन अतिक्रमण हटविले नसल्याने, एनएचएआय सोमवारपासून अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेणार आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे एक अधिकारी म्हणाले, या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुला हॉटेल, टपऱ्या, भाजीविक्रते, दुकानदार यांनी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. यामुळे रस्ता अरुंद झाल्याने, लोणी काळभोर (स्टेशन), कुंजीरवाडी, उरुळी कांचन हद्दीत सततची वाहतुक कोंडी होत आहे. तर दुसरीकडे अपघातही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लोणी स्टेशन व कुंजीरवाडी हद्दीत तर अतिक्रमणांमुळे रस्ताच दिसत नसून दुसरीकडे उरुळी कांचन गावात रस्त्यातच वाहन उभी राहत असल्याने, वहातुक कोंडीची समस्या ही नित्याचीच बनली आहे. यातुन नागरीकांना दिलासा देण्याच्या हेतुने ही कारवाई करण्यात येणार आहे.
अतिक्रमणाने ग्रासले रस्ते..!
पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यापारी व व्यवसायीकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत. यामध्ये कवडीपाट टोल नाका, वाकवस्ती, लोणी स्टेशन चौक, लोणी कॉर्नर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन मधील एलाईट चौक, तळवडी चौक व कासुर्डी टोल नाका या ठिकाणांचा समावेश आहे. यापैकी सुमारे ७० टक्के अतिक्रमणामुळे रस्त्यातील वाहतुकीला आडकाठी होत असल्याने या कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे.
कारवाईचा खर्च अतिक्रमणधारकांकडुन वसुल केला जाणार..!
पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मिटर (पन्नास फुट) अंतराच्या आतील सर्व प्रकारची अतिक्रमणे हटविली जाणार असल्याबाबतची नोटीस पंधऱा दिवसापुर्वी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने वर्तमानपत्रात दिली होती. यात अतिक्रमण धारकांनी अतिक्रमणे स्वतःहुन न हटविल्यास, अतिक्रमण कारवाईचा खर्च अतिक्रमण धारकांच्याकडुन वसुल करण्यात येणार असल्याचे नोटीस मध्ये नमुद केले होते.
यामुळे सोमवारपासुन सुरु होणाऱ्या मोहीमेचा सर्व खर्च अतिक्रमण धारकांकडुन वसुल केला जाणार आहे. एखाद्या अतिक्रमण धारकांने खर्च देण्यास नकार दिल्यास, तो खर्च संबधितांच्या सातबारावर चढविला जाणार आहे. तर या मोहीमेला विरोध केल्यास, संबधितावर पोलिस कारवाई केली जाणार असल्याचेही एनएचएआयने स्पष्ट केले आहे.