मुंबई : गॅस चोरी टाळण्यासाठी केंद्र सरकारने गॅस सिलेंडरवर थेट ‘क्यूआर’ कोड बसविण्यास सुरुवात केली असून आगामी तीन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. ‘क्यूआर कोड’ प्रत्येक सिलेंडर ‘ट्रॅक’ होणार असल्याने गॅसचोरी करणाऱ्याना चाप बसणार आहे.
डिलिव्हरी करणाऱ्याने गॅस सिलेंडर दिल्यानंतर त्याचे वजन केल्यास किमान एक – दोन किलो गॅस कमी आल्याची असंख्य उदाहरणे आपल्या समोर आहेत. याबाबत तक्रार केली तरी याचा शोध घेणे कठीण होते. त्यामुळे गॅसचोरी करणाऱ्याची यातून सहीसलामत सुटका होत असे. यात ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने यावर केंद्र सरकारने उपाय योजना करताना ‘क्यूआर कोड’ लावण्याचा निर्णय घेतला आहे.
सिलेंडरमधून गॅसचोरी रोखण्यासाठी केंद्र सरकार आधार कार्डच्या धरतीवर ‘क्यूआर कोड’ असणाऱ्या कार्डची निर्मिती करत आहे. गॅसचोरी रोखण्यासाठी केंद्र सरकार आधारकार्ड प्रमाणेच ‘क्यूआर कोड’ ने सज्ज असलेले कार्ड तयार करत असून यामुळे सिलेंडरचा मागोवा घेणे शक्य होणार आहे. यामुळे गॅसचोरी करणाऱयांना चाप बसणार आहे, अशी आशा केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली.
आगामी तीन महिन्याच्या काळात नवीन सिलेंडरला ‘क्यूआर कोड’ बसवूनच ते बाजारात आणण्यात येणार असून जुन्या सिलेंडरवर देखील ‘क्यूआर कोड’ चे मेटल स्टिकर वेल्डिंग करून आणले जाणार आहेत. यामुळे गॅस सिलेंडर कोणत्या डीलरकडून प्राप्त झाला, कोणत्या डिलिव्हरीमनने तो दिला, याची नोंद असणार आहे. तसेच दिलेला सिलेंडर कितीवेळा भरला गेला किंवा रिफील केला गेला याची देखील नोंद ‘क्यूआर कोड’ च्या माध्यमातून होणार असल्याने गॅसचोरीच्या घटना आपल्यालाच तपासता येणार असल्याचे आयओसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.