मालदा : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात सत्तारूढ तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक दुलाल सरकार यांची गुरुवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. नगरसेवक दुलाल सरकार ऊर्फ बाबला यांना झालझलिया परिसरात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी घेरले. यावेळी त्यांच्या डोक्यात अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत त्वरित रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.