बारामती : केंद्र शासनाची किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नाव नोंदणीसाठी सोमवार (दि.६) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाईन नोंदणी केली नाही, अशा शेतकऱ्यांनी बाबालाल काकडे, नीरा कॅनॉल संघ येथे सोयाबीन नोंद असलेला सन २०२४-२५ पिकपेरासहीत ७-१२ उतारा, आठ-अ, आधारकार्ड व आयएफएससी कोडसह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, अशा शेतकऱ्यांना एसएमएमद्वारे शेतमाल घेऊन येण्याची तारीख कळविण्यात येते. त्याच दिवशी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आपला माल आणावा. तसेच, १५ ऑक्टोबर २०२४ पासून सोबायीन खरेदी केंद्र बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवारातील यांत्रिक चाळणी येथे सुरू असून, आज अखेर या केंद्रावर २५५ शेतकऱ्यांचे २१५० किंवटल सोयाबीन खरेदी झाले आहे. तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवार (दि. ६) पर्यंत आपली नोंदणी करून खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा, असे आवाहन समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.