सोलापूर: गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात कधी वाघ तर कधी विबट्याचे दर्शन घडून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात वाघाचा वावर वाढला असल्याने वन विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यात कधी बिबट्या तर कधी वाघ दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या आठवड्यात देबरेवाडी (ता. बार्शी) येथे वाघाचे दर्शन झाले होते. मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी येथील पवार वस्तीवरील शेळी बिबट्या सदृश्य प्राण्याने फस्त केल्याची घटना घडली आहे. गेल्या महिनाभरात बार्शी तालुक्यातील अनेक गावात पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या बिबट्या सदृश्य प्राण्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे आश्वासन वारंवार दिले जात असले, तरी त्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने तशी परवानी दिली नसल्याची माहिती दिली जात आहे. जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येणार नाहीत, तोपर्यंत वाघ अथवा बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले जाणार नाहीत, असेही सांगण्यात येते.
परवानगीशिवाय करता येत नाही जेरबंद
गेल्या काही दिवसांपूर्वी बार्शी तालुक्यात बिबट्या आणि वाघाचा वावर असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात त्याचे लोकेशन कोठेही आढळून आलेले नाही. त्यास जेरबंद करुन सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाला परवानगी मागितली आहे. ती अद्याप मिळालेली नाही, असे सोलापूरचे उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी सांगितले.