सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री ते मुस्ती मार्गावर आज सकाळी साडे आठ वाजता झालेल्या भीषण अपघातात तिघा बिगारी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या कामगारांच्या दुचाकीला (MH-13-DJ-5466) एका अनोळखी डंपरने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील तिघांनी जागीच प्राण सोडले.

मृत्यू पावलेले तिघेही मुस्ती गावचे रहिवासी होते. या अपघातात देविदास दुपारगुडे (वय ४०), नितीन वाघमारे (वय ३५) आणि हनुमंत राठोड (वय ४०) या तिघांचा समावेश आहे. त्यातील हनुमंत राठोड हे मुस्ती तांडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून, डंपर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघातामुळे मुस्ती गावात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी प्रशासनाकडे रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.







