हडपसर : डी. पी. रस्त्यावरुन भगीरथी नगर सोसायटीकडे पायी जात असताना एका वाटसरूचा मोबाईल चोरून चोरट्यांनी 200 ते 300 मीटर फरफटत नेणाऱ्या घटना घडली होती. या गुन्ह्यातील तिन्ही चोरट्यांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्यांकडून गुन्ह्यातील मोबाईल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मंथन त्रिलोक पवार (वय १९ वर्ष रा. सुगंगा हार्डवेअर मागे, क्रांती चौक, सर्वोदय कॉलनी मुंढवा पुणे), कृष्णा संजय वाणी (वय २०) व रोहीत किरण वाणी (वय २१, दोघेही रा. स.नं ८९, ताडीगुत्ता चौक, ओंकार गॅरेज शेजारी, धायरकर वस्ती मुंढवा पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावला होता. तेव्हा त्यास फिर्यादी यांनी विरोध केला असता, आरोपींनी त्यांना फरफटत नेले होते. यामध्ये फिर्यादीच्या डाव्या पायाला व दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली आहे. तसेच गाडीवरील पाठीमागे बसलेल्या आरोपीने फिर्यादीच्या हाताला चावा घेतला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांनी गुन्ह्याचे घटनास्थळ असलेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पोलिसांना ३ संशयित इसम दिसून आले. पोलिसांनी संशयितांना शोधण्यासाठी 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून आरोपींची ओळख काढली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने तिन्ही चोरट्यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे करीत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, सचिन जाधव, दिपक कांबळे, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, प्रशांत दुधाळ व निखील पवार यांच्या पथकाने केली आहे.