मंचर: चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेली काजल रोहिदास इंदोरे, निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिक्षण घेतलेला ओंकार गजानन गोरे, जवळे (ता. आंबेगाव) येथील ऋषिकेश संजय खालकर या विद्यार्थ्यांनी अवघड समजल्या जाणाऱ्या सीएची (सनदी लेखापाल) परीक्षा उत्तीर्ण झाले.
जवळे येथील प्रगतशील शेतकरी संजय सदाशिव खालकर यांचा ऋषिकेश हा मुलगा असून त्याचे प्राथमिक शिक्षक जवळे गावातील प्राथमिक शाळेत झाले तर दहावीपर्यंत शिक्षण निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयात झाले. तर बारावी, बी. कॉम व एम. कॉम हे मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आर्ट अँड कॉमर्स पुणे या ठिकाणी झाले. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश हा २५ व्या वर्षी सीए झाला आहे.
उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रोज आठ ते दहा तास अभ्यासाचे योग्य नियोजन करून त्याने हे यश संपादन केले आहे. मला हे यश मिळविण्यासाठी माझी आई सुरेखा, वडील संजय सदाशिव खालकर, भाऊ सौरभ, चुलते चुलते संतोष खालकर आणि कुटुंबीयांकडून नेहमीच सकारात्मक पाठिंबा मिळाला. तर सर्व शिक्षक आणि मित्र परिवाराकडून योग्य असे मार्गदर्शन मिळाले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. या सर्वामुळेच एवढी अवघड परीक्षा उतीर्ण झालो असल्याचे ऋषिकेश खालकर यांनी सांगितले.