तुमसर (भंडारा): तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत झंझेरिया-पचारा बिटातील तीन पुलिया तलावाजवळ ६ जानेवारी रोजी एका तीन वर्षीय वाघिणीची निर्दयीपणे शिकार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. तारांच्या कुंपणाद्वारे विद्युत प्रवाह सोडून वाघिणीचा जीव घेतल्यानंतर तिच्या मृतदेहाचे चार तुकडे करून जंगलात फेकण्यात आल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, तुमसर न्यायालयाने तिन्ही आरोपींना ११ जानेवारीपर्यंत वनकोठडी ठोठावली आहे.
पचारा येथील शेतकरी राजू पिरतराम वरखडे (५०) याने आपल्या धानपिकाचे रक्षण करण्यासाठी २ जानेवारी रोजी शेताभोवती तारांचे कुंपण उभारले आणि त्यात विद्युत प्रवाह सोडला. ३ जानेवारी रोजी सकाळी शेतात आल्यानंतर कुंपणात वाघिणीचा मृतदेह अडकल्याचे त्याने पाहिले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने नवेगाव येथील दुर्गेश तुळशीदास लसुते (५०) व राजेंद्र उर्फ बस्तीराम महादेव कुंजाम (५५) यांना बोलावून मदत घेतली. तिघांनी मिळून वाघिणीच्या मृतदेहाचे चार तुकडे करून पोत्यात भरले व झंझेरिया जंगलात फेकले. ६ जानेवारी रोजी गस्तीदरम्यान झंझेरिया बिटातील तीन पुलिया
तलावाजवळ वाघिणीच्या मृतदेहाचे तुकडे आढळले. मृतदेह सडल्याने परिसरात उग्र वास पसरला. माहिती मिळताच नागपूर, भंडारा आणि तुमसर येथील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. शवविच्छेदन अहवालातून वाघिणीचा मृत्यू विद्युत करंटमुळे झाल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींनी अटकेनंतर दिली कबुली
या प्रकरणाचा श्वानपथकाच्या साहाय्याने तपास करण्यात आला. श्वान थेट राजू वरखडे याच्या घरी पोहोचल्याने त्याच्यावर संशय बळावला. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वाघिणीच्या शिकारीसाठी वापरलेले साहित्य जात करण्यात आले. मंगळवार, ७ जानेवारी रोजी तिन्ही आरोपींना तुमसर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ११ जानेवारीपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तपास उपवनसंरक्षक राहुल गवई, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी रितेश भोंगाडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.