कात्रज (पुणे): कोंढवा बुद्रुक परिसरात नायलॉन मांजामुळे तिघे जखमी झाले. कोंढवा बुद्रुक येथील शांतीनगर सोसायटी येथील नातलगांना भेटून घरी जाताना ज्योती कद्रे या गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने निघाल्या होत्या. या वेळी नायलॉन मांजाने त्यांच्या मानेला मोठी दुखापत झाली. तसेच, दुचाकीवरील दोन महिला मांजामुळे जखमी झाल्या आहेत. प्रशासन आणि पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांच्या जिवाला धोका आहे. या मांजाच्या विक्रीवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे सर्रास विक्री होत आहे.
पाच वर्षांत केवळ १६ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१७ पासून हानीकारक नायलॉन मांजाचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने मानव, प्राणी आणि पर्यावरणाच्या सुरक्षेचा हवाला देत पतंग उडवण्यासाठी नायलॉन धाग्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करण्यावर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली होती. आता संक्रांतीचा सण जवळ आल्याने पुणे पोलिसांनी शहरातील बंदी असलेल्या मांजाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कारवाईची मागणी होत आहे.