भिगवण (पुणे): भिगवण परिसरात लिफ्ट देण्याचा बहाणा करून लुटणाऱ्या टोळीला भिगवण पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आहे. या टोळीकडून ५४ हजार रुपयांचा माल हस्तगत केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीमध्ये एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
संभाजी भोसले, महानंदा भद्री पवार ऊर्फ महानंदा लीला पवार, ममता संभाजी भोसले (सर्व रा. बिसमिल्लानगर, मुळेगाव रोड, उत्तर सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी लीलाबाई पोपट मोघे (रा. राजेगाव, ता. दौड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ७ डिसेंबर) दुपारी बारा वाजल्याच्या दरम्यान मौजे भिगवण गावाच्या हद्दीत सागर हॉटेलसमोरील सोलापुर-पुणे रोडवर फिर्यादी लीलाबाई मोघे आणि त्यांची नणंद शकुंतला फासगे या रावणगावकडे निघाल्या होत्या. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमधून एक पुरुष व दोन महिला यांनी त्यांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून त्यांना गाडीमध्ये बसवले. त्यानंतर भिगवण गावापासून थोडे पुढे गेल्यानंतर फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र काढून घेतले व त्यांना खाली उतरविले. त्यानंतर ते पसार झाले.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपींचा माग काढून संभाजी भोसले, महानंदा पवार, ममता भोसले या तिघांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. या गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र त्यांच्याकडून परत घेण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जर्दे हे करीत आहेत. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक विनोद महागडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जर्दे, दीपाली खेत्रे यांनी केली.