सोलापूर: एक किलो सोन्याच्या खंडणीसाठी शहरातील बाप- लेकाचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी शिताफीने अटक केली. महेश गजेंद्र शिंगाडे (रा. मुळेगांव, ता. दक्षिण सोलापूर), उमेश अंकुश बंडगर, शंकर ऊर्फ दादा अनिल माशाळकर (दोघेही रा.इटकळ, ता. तुळजापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
नागेश धर्माधिकारी व त्यांचा मुलगा समर्थ धर्माधिकारी यांचे ८ दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. राहत्या घरातून त्या दोघांना पळवून नेले होते. याबाबत स्नेहा नागेश धर्माधिकारी (वय-५०, रा. हरिप्रसाद अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२१ सप्टेंबर रोजी संशयितांनी त्या दोघांचे अपहरण करून शहापूर येथील शेतामध्ये नेले. तेथे त्यांना जबर मारहाण केली. त्यांनी एक किलो सोन्यासाठी दोघांना कारमध्ये डांबून ठेवले, खंडणीची पूर्तता होत नसल्याने २३ सप्टेंबर रोजी फिर्यादी यांचे पती व मुलास सोडून देऊन मोबाईल बंद करून पसार झाले होते. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, हवालदार प्रवीण चुंगे, पोलीस अंमलदार कृष्णा बडरे यांचे पथक तयार केले होते.
अनोळखी मोबाईल अन्…
संशयितांचा शोध घेताना पोलिसांकडे कोणतीही उपयुक्त माहिती नव्हती. अपहरणानंतर फिर्यादी स्नेहा धर्माधिकारी यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता. त्या मोबाईल कॉलच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध लावला. पोलिसांनी शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास माळवाडी परिसरातून तिघाही संशयीतांना ताब्यात घेऊन अटक केली.