ओतूर : नवीन वर्षाचं जगभरात स्वागत केलं जात असून आज सकाळपासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच सुविचार अन् नव्या संकल्पासह नव्या वर्षाची सुरुवात केली जात आहे. राज्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळीही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. असं असताना जुन्नर तालुक्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.
कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील सीतेवाडी गावच्या हद्दीत अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर सीतेवाडी फाट्याजवळ बुधवारी (ता. १) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या अपघात निलेश ज्ञानेश्वर कुटे (वय-४०), जयश्री निलेश कुटे (वय-३५), सान्वी निलेश कुटे (वय-१४, सर्व रा. पिंपरीपेंढार, साळशेत, ता. जुन्नर) अशी ठार झालेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तीची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निलेश कुटे हे बुधवारी पिंपरीपेंढार येथून दुचाकी क्रमांक एम एच ०५ बी एक्स ४८२४ वरून कल्याण बाजूकडे जात होते. यावेळी कल्याण बाजूकडून अहिल्यानगरकडे येणारी कार एम एच १६ एटी ०७१५ यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकीवरील निलेश कुटे त्यांची पत्नी जयश्री कुटे व मुलगी सान्वी कुटे हे तीन जण ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहे.