लोणी काळभोर, (पुणे) : क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा उत्कृष्ट तपास केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस दलातील ०३ पोलीस अधिकाऱ्यांना गृह विभाग भारत सरकारकडुन “केंद्रीय गृहमंत्री पदक” सन २०२२ शुक्रवारी (ता. १२) जाहीर झाले आहे.
लोणावळा शहर येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार, शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, व वेल्हा येथील प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गंभीर गुन्हयांचा तपास उत्कृष्टरित्या करणाऱ्या तपासी अधिकारी यांना गृह विभाग भारत सरकारकडुन “केंद्रीय गृहमंत्री पदक” दरवर्षी प्रदान केले जाते. याकरीता महाराष्ट्र पोलीस दलास दरवर्षी एकुण ११ पदके प्रदान केली जातात. पुणे ग्रामीण पोलीस दलाकडुन क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा उत्कृष्ट तपास करणाच्या एकुण ०४ तपासी अधिकारी यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात आला होता. त्यापैकी ०३ तपासी अधिकारी यांना उत्कृष्ट तपासा करीता गृह विभाग भारत सरकारकडुन “केंद्रीय गृहमंत्री पदक” सन २०२२ जाहिर झाले आहे.
पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे लोणावळा शहर येथे प्रभारी अधिकारी असताना डॉ. खंडेलवाल रा. लोणावळा यांच्या घरात दारोडा टाकला होता. या गुन्हयात मध्यप्रदेश मधील आंतरराज्यीय टोळी निष्पन्न झाल्यावर आरोपीतांना मध्यप्रदेशमधुन अटक करण्यात आली होती. या गुन्हयाच्या अनुषंगाने तपासा दरम्यान वरीष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पवार व त्यांचे पथकाने गुन्हा घडल्या तारेखेपासुन १० दिवसाच्या आत गुन्हयाची उकल केली. पवार व त्यांचे पथकाने १५ आरोपींना अटक करून गुन्हयात गेलेला एकुण ३० लाख ५२ हजार २०० रुपये किंमतीचा रोख रक्कम व मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे शिरूर येथे प्रभारी अधिकारी असताना बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपरखेड ता. शिरूर या ठिकाणी बँकेचे कर्मचारी व हजर ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवुन एकुण ८२४ तोळे साने चांदीचे दागिने व रोख रक्कम ३२ लाख ५२ हजार ५६० रूपये असा ऐवज लुटून नेला होता. हा गुन्हा उघड करण्याच्या दृष्टीने पुणे ग्रामीण पोलीस दलासमोर आव्हान होते. सदर गुन्हयाचा शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा यांनी समांतर तपास करून या गुन्हयामध्ये एकुण २ कोटी, ३६ लाख, ४२ हजार ९६० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून ०५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.
सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे वेल्हा येथे प्रभारी अधिकारी असताना कातकरी समाजाची एक लहान मुलगी हरविलेबाबत तकारीवरून वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सदरची मुलगी मयत स्थितीत मिळुन आली होती. या मुलीच्या शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी तिचेवर लैंगिक अत्याचार होवुन ती मयत झालेबाबत अभिप्राय दिला होता. त्यावरून सदर गुन्हयास पोक्सो कायद्याअंतर्गत वाढीव कलम लावण्यात आले होते. सदरचा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पवार व त्यांचे पथकाने आरोपीस ४८ तासात जेरबंद केले होते. सदरचा खटला डॉ. अभिनव देशमुख यांच्या विनंती नुसार जलदगती न्यायालयात चालविला गेला व सदर गुन्हयात आरोपीस न्यायालयाने २८/०२/२०२२ रोजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनाविली आहे.
त्यांच्या या कामगिरीबाबत अशा या क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा तपास करतांना जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग व उपविगीय पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गृह विभाग भारत सरकारकडुन उत्कृष्ट तपासाकरीता “केंद्रीय गृहमंत्री पदक” सन २०२२ करीता जाहीर झालेले पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचे विशेष अभिनंदन केले आहे.