बदलापूर: आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचित दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात समोर आली आहे. या प्रकरणी दोन तरुणांसह तरुणीला गुंगीचे औषध देणाऱ्या मैत्रिणीलाही अटक करण्यात आली आहे.
बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव येथे राहणाऱ्या तरुणीसोबत ओळख झाली होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी तिने तिच्या वाढदिवसासाठी पीडित तरुणीला तसेच तिच्या दोन मित्रांना तिच्या घरी पार्टीसाठी बोलावले होते. रात्रभर पार्टी केल्यानंतर तिने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकले. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर तिच्या घरी आलेल्या इतर दोन मित्रांपैकी एकाने अत्याचार केला.
मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने पीडित तरुणीच्या पालकांनी त्या मुलीला संपर्क केला असता, तुमची मुलगी मद्य प्राशन करून येथे पडल्याचे तिने सांगितले. पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानुसार तिने याबाबत पालक आणि पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली असता तरुणीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न होताचं, तरुणीला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण व सातारा येथून आलेले दोन मित्र असे एकुण तिघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोल निरीक्षक किरण वालवडकर यांनी दिली.