चंदननगर : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीला छेड काढून तू जर माझी झाली नाहीस तर तुला कुणाचीच होऊ देणार नाही, तुझ्यासह संपूर्ण कुटुंबाला बंदुकीने गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना चंदननगर परिसरात घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. हे आदेश फौजदारी न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी अशोक पांडे यांनी दिले आहे.
किरण नाना धायगुडे (वय-22, बोराटे वस्ती, चंदननगर) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 20 वर्षीय महाविद्यालयीन मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तर सदर प्रकार हा नोव्हेंबर 2021 मध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत व आरोपी किरण धायगुडे हे दोघेही एकाच परिसरात राहतात. किरण धायगुडे याने एकतर्फी प्रेमातून फिर्यादी हिला धमकी दिली की ‘तू जर माझी झाली नाहिस तर तुला कुणाचीच होवू देणार नाही’ व बंदूक विकत घेतानाचे फोटो पाठवून फिर्यादीसह संपूर्ण कुटुंबाला गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. सदर प्रकरणात आरोपी किरण धायगुडे यांच्या वतीने ॲड. गणेश माने यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात सरकार पक्षाच्या साक्षीदारांचा उलटतपास ॲड. गणेश माने यांनी घेतला. सदर उलट तपासानुसार आरोपीच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध होईल? असा कोणताही पुरावा अभिलेखावर आला नसल्याबाबतचा युक्तिवाद ॲड. माने यांनी केला. सरकार पक्षाचा व बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने उपरोक्त आरोपी किरण धायगुडे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात ॲड. गणेश माने यांना ॲड. विजय कुंभार, ॲड.समीर भरेकर, ॲड. धनंजय गलांडे व ॲड. उमेश मांजरे यांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले.