पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना धमक्या देणाऱ्या आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर लँडलाइन फोनवर कॉल करून वारंवार धमकी देण्यात येत होती. या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गिरगाव दंडाधिकारी न्यायालयानं धमक्या देणाऱ्या आरोपीला चांगलाच दणका दिला आहे. नारायणकुमार सोनी याला दोषी ठरवण्यात आलं असून दीड वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर नारायणकुमार यानं कॉल केला करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सकाळपासून रात्री ८ वाजेपर्यंत नारायणकुमारने कॉल केले होते. या प्रकरणी शरद पवार यांच्या निवासस्थानावरी टेलीफोन ऑपरेटर कृष्णा देऊळकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांकडून नारायणकुमार याला ताब्यात घेण्यात आलं होतं.
नारायणकुमार सोनी याला १४ डिसेंबर २०२२ रोजी अटक केली होती. तेव्हापासून नारायणकुमार तुरुंगात आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुरावे सादर केल्यानंतर नारायणकुमार याला दोषी ठरवण्यात आले. शरद पवार यांच्या निवासस्थानी नारायणकुमारने धमकी देणारे अनेक कॉल केले. त्यानं अर्वाच्च भाषा वापरून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं कॉल डेटा रेकॉर्डमधून समोर आलं आहे. नारायणकुमार सोनी याची शिक्षा माफ करता येणार नाही असं म्हणत नारायणकुमारला एका गुन्ह्यात तीन महिन्यांची आणि धमकी दिल्या प्रकरणी दीड वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.