पुणे : पुण्यातून रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना विमानातळाप्रमाणेच एक तास आधी पोहोचावे लागणार आहे. नियोजित ट्रेन सुटण्याच्या आधी एक तास प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याचा सल्ला रेल्वे व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेनमध्ये चेन ओढण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच पुणे शहरातील वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे ज्यामुळे रेल्वेच्या कामकाजावर, विशेषतः संध्याकाळच्या वेळी परिणाम झाला आहे. नातेवाईक आणि मित्र ट्रॅफिकमध्ये अडकल्याने आणि वेळेत स्थानकावर पोहोचू न शकल्याने प्रवासी चेन खेचतात.
त्यामुळे प्रवाशांना आमचे आवाहन आहे की, पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी त्यांच्या संबंधित स्थानावरुन वेळ आणि अंतराचं कॅल्क्युलेशन करावे आणि ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या किमान एक तास आधी पोहोचावे, असे पुणे रेल्वे विभागाचे प्रवक्ते मनोज झंवर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, जानेवारी ते ऑक्टोबर रेल्वेमधील चेन खेचण्याच्या ११६४ घटना घडलेल्या आहेत. यात ९१४ प्रवाशांना अटक देखील करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्याकडून एक लाख ८० हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. यात तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
त्यामुळे चेन खेचून दंड भरण्याची वेळ ओढवून घ्यायची नसेल तर प्रवाशांनी एक तास आधीच रेल्वे स्टेशनवर पोहचण्याच्या सूचना प्रशासनाने केलेल्या आहेत.