पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा लक्ष देण्यास सुरुवात केल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला ठाकरे गटातील नेत्यांने हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे गटातील संजोग वाघेरे यांनी बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
कोण आहेत संजोग वाघेरे?
संजोग वाघेरे यांची राजकीय सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच झाली. त्यांचे सर्व कुटुंब हे राष्ट्रवादीसोबत होते. त्यांनी राष्ट्रवादीत असताना पिंपरी चिंचवड शहरातील अनेक महत्वाची पदे भूषविलीआहेत. त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकत उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेत प्रवेश केला होता. त्यांनीमावळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना अपयश आले.मात्र आता पुन्हा एकदा संजोग वाघेरे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत.
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधासभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी जल्लोषात त्याचं स्वागत करून सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे संजोग वाघेरे पुन्हा एकदा स्वगृही येणार अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र या चर्चेनंतर त्यांनी माझी राजकीय भूमिका वेगळी असल्याचे स्पष्टीकरण ही दिलं आहे.