पुणे : हनुमान टेकडी परिसरात लूटमारीचे सत्र कायम असून शनिवारी (दि. ४) तेथे फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन युवतीला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी लुबाडून नेली. गेल्या महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. यासंदर्भात एका महाविद्यालयीन युवतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
ही युवती तिच्या मित्रासमवेत शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ केली. तसेच त्यांनी युवतीला मारहाण करुन तिची सोनसाखळी लांबवली. भयभीत झालेल्या या युवतीने सोमवारी (दि. ६) डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या परिसरात गेल्या दोन महिन्यांमध्ये टेकडीवर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन युवकांना लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर, बाणेर-पाषाण रस्त्यावरील टेकडीवरही लुटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत.