लोणी काळभोर : चोरट्यांनी दुकानाचा पत्रा उचकटून दुकानातील रोख रकमेसह लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना शेवाळवाडी (ता. हवेली) येथील हरपळे लॉन्स परिसरात घडली असून सोमवारी (ता.6) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याप्रकरणी गणेश अर्जुन काळभोर (वय-३६ रा. जय गणेश निवास, रायवाडी, लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलम 331 (3), 331 (4), 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश काळभोर हे एक व्यावसायिक असून ते लोणी काळभोर परिसरात कुटुंबासोबत राहतात. काळभोर यांचा शेवाळवाडीत जय गणेश कार अक्सेसरिज नावाचे दुकान आहे. या दुकानातून गाडीच्या सामानांची विक्री करण्यात येते. काळभोर यांच्या दुकानात तीन जण काम करतात. कामगारांनी नेहमी प्रमाणे रविवारी (ता.५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी निघून गेले होते.
दरम्यान, सोमवारी (ता.6) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कामगार दुकान उघडण्यासाठी गेले असता, चोराने दुकानाच्या वरचा पत्रा कट झाल्याचे दिसून आले. त्यानंतर कामगाराने दुकानात जाऊन पाहणी केली असता, दुकानातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आहे. दुकानाची पाहणी केली असता, दुकानातील ८२ हजार रुपयांची रोकड, मोबाईल आणि म्युजिक सिस्टीमचे दोन प्लेअर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा 1 लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे आढळून आले. त्यांनतर कामगारांनी याची माहिती फोनद्वारे पोलिसांना व दुकान मालक गणेश काळभोर यांना दिली.
याप्रकरणी गणेश काळभोर यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार पिसे करीत आहेत.