संदीप बोडके
लोणी काळभोर (पुणे) : जिल्हा सत्र न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयानेही थेऊरच्या फरार व लाचखोर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जिल्हा सत्र न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयानेही जयश्री कवडे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने, यापुढील काळात कवडे पोलिसांना शरण येणार की अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार याकडे पूर्व हवेलीमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कोलवडी (ता. हवेली) गावातील एका शेतकऱ्याची सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात १३ मार्च रोजी थेऊरच्या वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कवडे फरार झाल्या आहेत.
या प्रकरणात अटक टाळण्यासाठी जयश्री कवडे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा व सत्र न्यायालयाने कवडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज २२ मार्चला फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, तेथेही जामीन अर्ज फेटाळल्याने कवडे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, कोलवडी (ता.हवेली) येथील एका खातेदार शेतकऱ्याकडे, त्याच्या आदेशाची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी जयश्री कवडे यांच्या कार्यालयामधील विजय नाईकनवरे व योगेश तातळे या दोन खाजगी इसमांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तडजोडअंती प्रत्यक्षात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना विजय नाईकनवरे व योगेश तातळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले होते.
या लाचेसाठी प्रोत्साहन दिल्याने जयश्री कवडे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्या तेव्हापासून गायब झालेल्या असून, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली होती. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयानेही कवडे यांना अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला आहे.
जयश्री कवडे यांच्या कलेक्टरवर सलग दुसरा गुन्हा
जयश्री कवडे लाचखोरीच्या पहिल्या गुन्ह्यात अटकेपासून सरंक्षण मिळावे यासाठी जिल्हा सत्र न्यायालयापासून मुंबई उच्च न्यायालयापर्यंत धावपळ करत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कवडे यांचाच खाजगी कलेक्टरवर, विजय नाईकनवरे याच्यावर लाचखोरीचा दुसरा गुन्हा दाखल केल्याने कवडे यांच्या समोरील अडचणीत वाढ होऊ लागली आहे. त्याचवेळी दुसरीकडे हवेली महसूल विभागाचा लाचखोर कारभारही मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
तत्कालीन मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्याच कार्यालयातील खासगी इसम विजय नाईकनवरे यांनी कोलवडी (ता. हवेली) येथील फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी, एका ६५ वर्षीय व्यक्तीकडे तब्बल ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्या तक्रारीची शासकीय पंचासमक्ष पडताळणी झालेली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३१ मार्चला लोणी काळभोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
जयश्री कवडे निलंबितच…
कोलवडी (ता. हवेली) गावातील एका शेतकऱ्याची सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात जयश्री कवडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करताच, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कवडे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे जाहीर केले होते. सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयाने जामिनास नकार दिल्याने आता सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार की पोलिसांना शरण जाणे हेच दोन पर्याय उरले आहेत. मात्र, जयश्री कवडे यांचा स्वभाव पाहता व त्यांच्या मागे असलेले राजकीय अदृश्य हात पाहता त्या अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील, अशी चर्चा महसूल खात्यात जोरदार सुरु आहे.