लोणी काळभोर, (पुणे) : लोणीकंद ते थेऊरगाव या रस्त्याच्या कामानिनित्त हा रस्ता बंद करण्यात आला असला तरी त्या ठिकाणी आणखी मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरु आहे. त्याचा परीणाम म्हणून बुधवारी (ता. १०) सकाळ पासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मार्गावर कॉंक्रिटीकरण करण्यासाठी लोणीकंद ते थेऊरगाव रस्ता रविवार (ता. ०७) ते मंगळवार (ता. ३०) ऑगस्टपर्यंत जड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या कालवधीत दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक सुरु राहील असेही सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी कळविले आहे. तरीही अवजड वाहने या मार्गावरून जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, लोणीकंद, लोणीकाळभोर वाहतूक विभाग पुणे अंतर्गत वरील कालावधीत थेऊर फाटा, नगर रस्ता ते थेऊर फाटा, सोलापूर रस्ता दरम्यान जड वाहनांस बंदी करण्यास येत आहे. त्यामुळे खराडी बायपास ते हडपसर तसेच वाघोली-केसनंद-वाडेबोल्हाई, पारगाव-केडगाव-चौफुला, पुणे- सोलापुर महामार्ग या रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु आहे.