सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर तालुक्यातील बहुतांशी साखर कारखाने सुरू झाले असून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, राशीन – भिगवण – बारामती राज्य महामार्गावर ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकरिता ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाठीमागील बाजूस रिफ्लेकटर लावणे फार गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने रिफ्लेक्टर सक्ती सोबत वाहतूक शिस्तीचे पालन होत की नाही याची तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
कर्मयोगी सहकारी साखर कारखाना बिजवडी, बारामती ऍग्रो कारखाना शेटफळगडे, छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर या कारखान्यांच्या यंत्रणेमार्फत ऊस तोडणी केली जाते. या सर्व कारखान्यात गाळपासाठी आणला जाणारा ऊस पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच राशीन-भिगवण-बारामती रोड वरून काही अंतर का होईना पण वाहतूक केली जाते. ऊस वाहतूक वाहनांची गती अत्यंत कमी असते. बऱ्याचवेळा या वाहनात बिघाड झाल्याने महामार्गाच्या कडेला ती उभी केलेली असतात.
राष्ट्रीय महामार्गावरची वाहने अत्यंत वेगाने जात असतात. ऊस वाहतूक करणारे वाहन मंद गतीने चालते.त्याला रिप्लेकटर लावला नसेल तर ते वाहन लांबून दिसत नाही. ते सुसाट वाहन ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर आदळते व अपघात घडून येतो. त्या वाहनास किंवा थांबलेल्या ऊस वाहनास जर रिप्लेकटर असेल तर तर मोठा होणारा अपघात टळू शकतो. अनेक वेळा मोठे अपघात घडलेले आहेत.
याकरिता कारखान्यातील ऊस वाहतूक विभागाने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रक रिप्लेकटर बसवणे गरजेचे आहे.ऊस वाहतूक ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. ज्यामुळे मागील बाजूने येणाऱ्या वाहनांचा हॉर्नचा आवाज चालकाला ऐकू येत नाही. यामुळे अपघात प्रमाण वाढत आहे. ऊस वाहतूक वाहनवर प्रशिक्षित चालक असणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या वाहतूक यंत्रणेने या बाबबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने करमाळा, दौंड व इंदापूर तालुक्यातील सीमारेषेवर असणाऱ्या गावांमधून विविध मार्गांवरून अनेक वाहनांतून धोकादायक पद्धतीने उसाची वाहतूक केली जात आहे. मागील काही वर्षांत वारंवार अपघात घडूनही वाहन चालक, मालक यांनी यातून काहीही धडा घेतला नसल्याचे सध्या सुरू असलेल्या वाहतुकीवरून दिसत आहे. अपघाताची दाट शक्यता गृहीत धरून प्रशासकीय यंत्रणेने याबाबत जागृती करणे गरजेचे आहे.
बैलगाडी, टूक आणि ट्रॅक्टरमधून उसाची वाहतूक सुरू आहे.ट्रॅक्टर चालक दोन ते तीन ट्रॉल्या जोडलेली वाहने बर्याचदा रस्त्याच्या कडेला उभी करीत आहेत. त्यामुळे पाठीमागून येणार्या वाहनांना अडथळा निर्माण होऊन रस्त्यावर लांबच्या लांब रांगा लागतात. विना क्रमांकाची वाहने, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, विमा, रिफ्लेक्टर नसणे, चढ-उतार, वळण आदी ठिकाणी अचानक वळणे अशा पद्धतीने उसाची वाहतूक सुरू आहे. आरटीओ विभागाकडून रस्ता सुरक्षा सप्ताहात रिफ्लेक्टर आणि सुरक्षित वाहन चालविणे याविषयी मार्गदर्शन केले जाते; मात्र त्याशिवाय तो विभाग फारसे काही करताना दिसत नाही. एखादा अपघात झाल्यानंतरच नियमांचे पालन करणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अल्पवयीन मुले ट्रॅक्टर चालक व बिनलाईन्सचे हाकतात ट्रॅकटर:
ट्रॅक्टरवर टेपरेकॉर्डिंग बसवून विविध हिंदी गाण्यांची धून सध्या गावोगावी ऐकायला मिळत आहे. काही अल्पवयीन मुलेही चालक म्हणून काम करतात. मोठ्या आवाजात गाणी ऐकत आणि उसाने भरलेल्या दोन ते तीन ट्रॉल्या ओढण्याची जणू स्पर्धाच रस्त्यावर दिसत आहे. बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिस प्रशासनानेही वाहतूक व्यवस्था व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
ट्रॅक्टर चालकांमध्ये लागतेय ओव्हरटेकची स्पर्धा
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी घाटामध्ये सर्रासपणे चढाला ट्रॅक्टर चालक एकमेकांना ओव्हरटेक करण्याची स्पर्धा लावल्याचे चित्र सर्रासपणे पाहायला मिळत आहे या ओव्हरटेकच्या नादात समोरून येणाऱ्या वाहनांना आपली वाहने रस्त्यावरून खाली घ्यावी लागत आहे पण भविष्यात ओव्हरटेकच्या नादात ट्रॅक्टर पलटी होऊन रस्त्याच्या खाली घेतलेल्या वाहनांवर पलटी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही व त्याच्यातून मोठी जीवित हानी घडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. एका माकोमात पाच ते सहा ट्रॅक्टर प्रवास करताना पाहायला मिळत आहे त्यामुळे लांबच लांब रांगा वाहनांच्या लागत असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.