शिरूर : शिरुर-आंबेगाव मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे देवदत्त निकम व महायुतीचे दिलीप वळसे पाटील अशी लढत झाली. यामध्ये महायुतीचे दिलीप वळसे पाटील विजयी झाले. यानंतर महाविकास आघाडीच्या शंकर जांभळकर यांच्या बंगल्यासमोर येत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जांभळकर यांच्या वाहनांसह बंगल्यावर गुलाल टाकत घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात काही तणाव निर्माण झाला आहे.
करंदी हे शिरुर-आंबेगाव मतदार संघातील शिरुर तालुक्यातील बेचाळीस गावातील एक गाव, सदर गावातील बाजार समितीचे माजी सभापती असलेले शंकर जांभळकर हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटात राहिले. त्यांनी महाविकास आघाडीचे देवदत्त निकम यांचा जोरदार प्रचार करत निवडणुकीला सामोरे गेले. दरम्यान, निकाल जाहीर होताच देवदत्त निकम यांचा निसटता पराभव होऊन अकराशे मताने महायुतीचे दिलीप वळसे पाटील विजयी झाले. यावेळी करंदीतून शंकर जांभळकर यांच्या कष्टाने निकम यांना एकशे पन्नास हून अधिक मतांची आघाडी मिळाली.
मात्र, विजयाचा जल्लोष साजरा करत असताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये डीजे वाजवत माजी सभापती शंकर जांभळकर यांच्या बंगल्यासमोर येत घोषणाबाजी करुन शंकर जांभळकर यांच्या वाहनांसह त्यांच्या बंगल्यावर तसेच गेटच्या आतमध्ये गुलाल फेकत जल्लोष केला. दरम्यान, शंकर जांभळकर यांच्या कुटुंबीयांनी याबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला असता जांभळकर यांच्या कुटुंबियांना देखील दमदाटी करण्यात आली. यामुळे परिसरात खळबळ उडत काही तणाव निर्माण झाला.