-राहुलकुमार अवचट
यवत : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी व्हावेत. यासाठी दुभाजक बसवण्यात आले आहेत. हेच सुरक्षितेसाठी बनविण्यात आलेले दुभाजक वाहन चालकांसाठी रात्रीच्या वेळेस धोकादायक ठरत असल्याचे चित्र सध्या यवत येथे दिसत आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील मलभारे वस्तीकडे जाणाऱ्या फाट्यावर दुभाजकच अपघाताला निमंत्रण देत आहे. रात्रीच्या अंधारात अवजड वाहने, चारचाकी वाहने दुभाजकावर जात असल्याचे प्रकार रोज घडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच एक चार चाकी वाहन या दुभाजकावर गेल्याने दुभाजकसह दोन पथ दिव्यांचे नुकसान झाले आहे. सदर दुभाजक आता ‘अॅक्सिडेंट पॉइंट’ झाला का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
रात्रीच्या वेळी पुण्यावरून येणाऱ्या वाहनचालकांना समोर दुभाजक असल्याचे लक्षात येत नसल्याने अनेक वाहने सरळ दुभाजकावर जातात. दुभाजकाची उंची कमी असल्याने अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान होते तर काही वेळा तर अपघातानंतर ही वाहने दीर्घकाळ तेथेच पडून राहतात. रात्री या परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार असतो. त्यातच अचानक दुभाजक समोर आल्याने वारंवार अपघात घडतात.
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी चालकाला अचानक दुभाजक न दिसल्याने एस. टी. दुभाजकाला धडकली. यावेळी एस. टी. तील प्रवाशी किरकोळ जखमी झाले. यात गाडीच्या समोरील बाजूची काचही फुटली होती.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच पाटस टोल प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर अशा सर्व ठिकाणी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा नागरिक करीत आहेत.