मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झालं आहे . त्यांनतर आता उद्या (दि. 23) निकाल जाहीर होणार आहे. निकालाआधी विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत जितेंद्र आव्हाड यांना एक चॅलेंज दिलं आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवार जर बारामती विधानसभा मतदारसंघातून पडले, तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्रात काम करेल. अजित पवार निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी 8 वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचं, असं चॅलेंज दिल आहे. पुढे म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री होतील, कारण आमच्या 35 जागा निवडून येतील. स्ट्राईक रेटवर आम्ही मुख्यमंत्री पद घेऊ, असा दावा देखील अमोल मिटकरी यांनी केला आहे. ते मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, संजय शिरसाठ यांना जसं वाटतं की मुख्यमंत्री त्यांचा होईल तसंच आमचं देखील म्हणणं आहे की, अजित पवार मुख्यमंत्री होतील. शेवटी अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. अजित पवार किंग मेकर ठरतील. उद्या दुपारी 1 पर्यंत सांगतो, असेही अमोल मिटकरी यावेळी म्हणाले.
अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील : मिटकरी
राज्यात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही. एक हाती सरकार कोणाचे येणार नाही. दोन चार जागांच्या फरकाने महायुतीला निसटता विजय मिळेल. फार मोठा विजय मिळणार नाही, तर निसटते सरकार स्थापन होईल, असंही अमोल मिटकरी यावेळी म्हणाले. तसेच येणाऱ्या 25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असा अंदाज अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.