पुणे : महिलेचे लग्न झाले असल्याने ती लग्न करणे शक्य नाही हे माहिती होते. त्यामुळे लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केला म्हणणे योग्य ठरणार नाही. तिच्या घरात आणि आरोपीच्या घरात जबरस्तीने अत्याचार केले म्हणण्यास वाव नसल्याचे नमूद करत बलात्कार प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी एका प्रकरणात निकाल देत छायाचित्रकार असलेल्या तरूणाला खटल्यातून वगळण्याचा आदेश दिला आहे. रोहीत पाचारणे (वय २१) असे खटल्यातून वगळण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणात २६ वर्षीय महिलेने भोसरी पोलिसांत तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी कि, महिला ही विवाहित आहे. तिला गुन्हा दाखल झाला त्यावेळी सहा वर्षाचा मुलगा आहे. डिसेंबर २०२१ मध्ये महिला रोहीत पाचारणे याच्याकडे फोटो काढण्यास गेली होती. तेव्हा त्यांची ओळख झाली होती. ओळखीतून तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने तिच्यावर तिच्या व त्याच्या घरी बऱ्याच वेळा बलात्कार केल्याचे म्हटले होते.
तरूणावर झालेल्या आरोपांमुळे तरूणाच्या वतीने अॅड. विभीषण गदादे यांनी तरूणाला खटल्यातून वगळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यात त्यांनी गुन्हा खोटा, बनावट आणि निराधार असल्याचा युक्तीवाद केला. तसेच दोघांमधील व्हॉट्सअॅप चॅटवरून दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे दिसून आले होते. तर तरूणाने लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळून आले नसल्याचा युक्तीवाद अॅड. गदादे यांनी केला.
त्यावर न्यायालयाने दाखल पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्यानुसार आरोपीने महिलेला लग्नाचे आमिषदाखवून बलात्कार केला असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरावे नाहीत, त्यामुळे आरोपीवर खटला चालवणे व्यर्थ ठरेल, आरोपीला पुढे या प्रकरणातून मुक्त केले जाईल, असा निर्वाळा न्यायालयाने देताना या खटल्यातून तरूणाला मुक्त केले आहे.