अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील हॉटेल सावली रेस्टॉरंट बारमधील तब्बल ९१६ दारुच्या बाटल्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गौरव सत्यप्रेम ओमनवार (वय ३८ वर्षे रा. वाडा वसाहत कॉलनी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदवाडी येथे गौरव ओमनवार यांचे हॉटेल सावली रेस्टॉरंट बार आहे. रात्रीच्या सुमारास हॉटेल बंद करुन सर्व कामगार घरी गेले होते. सकाळच्या सुमारास हॉटेल उघडले असता हॉटेल मधील सर्व साहित्य अस्थाव्यस्थ पडल्याचे दिसून आले. कामगारांनी याबाबतची माहिती गौरव ओमनवार यांना दिली.
त्यांनी हॉटेलमध्ये येऊन पाहणी केली असता हॉटेलच्या पाठीमागील बाजूची खिडकी पूर्णपणे बाजूला काढून ठेवल्याचे आणि सर्व देशी विदेशी वेगवेगळ्या प्रकारची दारु चोरीला गेल्याचे दिसून आले. हॉटेलमध्ये पाहणी केली असता चोरट्यांनी खिडकी बाजूला काढून ठेवून हॉटेल मधील देशी विदेशी वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल पावणे दोन लाख रुपये किमतीच्या ९१६ दारुच्या बाटल्यांची चोरी केल्याचे समोर आले.
याप्रकरणी ओमनवार यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी करत आहेत.