पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेतील एका जिममधून रोख रक्कम व किमती सामान असा एकूण ७३ लाख ३८ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत सीटी बारबेल क्लब, जिम टीसीजी स्केअर येथे घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कर्वेरोड येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय महिलेने बुधवारी (ता. २१) विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून राहुल हरिभक्त, संकेत हरिभक्त, आर्यन हरिभक्त, विवेकानंद एस किसरकर, विनायक केशव बापट, अविनाश आनंद जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सदाशिव पेठेत जिम असून, आरोपी त्यांच्या परिचयाचे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांना वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी करुन धक्कबुक्की केली. फिर्यादी यांची जिम बंद असताना आरोपींनी जिममधील किंमती सामान व रोख रक्कम चोरून नेले.
याबाबत फिर्यादींनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे करीत आहेत.