पुणे : पुण्यातील वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर रात्रीत पाच दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. सध्या दिवाळीमुळे पुणे शहरात गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत, प्रमुख मार्गांवर वर्दळ वाढली आहे. मात्र, याचाच फायदा घेत चोरट्यांनी फर्ग्युसन रस्त्यावर दुकाने फोडली आहेत. चोरट्यांनी पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील दुकाने फोडली आहेत. एका रात्रीत एकूण पाच दुकाने चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी लाखोंचा माल लुटला आहे. जवळपास १.२५ लाख रुपये लुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डेक्कन पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अट्टल चोरट्यांनी दुकाने फोडली असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.